वणी तालुक्यात “वारी प्रबोधनाची” या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याला परमडोह येथून सोमवार पासून सुरवात

वणी : ग्रामसमृद्धी, नैतिक मूल्यांची जोपासना, संतविचारांचा प्रसार व सामाजिक प्रबोधन या उदात्त हेतूने राबविण्यात येणाऱ्या “वारी प्रबोधनाची” या उपक्रमाचा दुसरा टप्पा वणी तालुक्यात मोठ्या उत्साहात सोमवार पासून सुरवात होणार आहे. 


या वारीचा शुभारंभ सोमवार, दि. 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता परमडोह येथील श्री नारायण बाबा देवस्थान येथे मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. प्रारंभी देवस्थानात विधिवत पूजा-अर्चा करून वारीला सुरुवात करण्यात येणार आहे. 


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच मधुकर वाभिटकर, तर स्वागताध्यक्ष म्हणून सौ. रुपलताताई निखाडे, उद्धाटक म्हणून गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे पाटील तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सप्त खंजिरी वादक राष्ट्रीय किर्तनकार इंजी. भाऊसाहेब थुटे, मोझरी येथील श्रीगुरुदेव गुरुकुलचे संचालक रवी मानव, श्रीगुरुदेव युवा मंचाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रक्षक, श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भोयर , युवा प्रबोधनकार राज घुमणार, तेलंगणा राज्याचे प्रचारक डॉ. उदार महाराज, उपस्थित असणार असून प्रमुख पाहुणे संजय निखाडे, विठ्ठल डाखरे महाराज, नेताजी पारखी, संतोष वऱ्हाटे, कवडू वडस्कर संकेत गज्जलवार, यांचेसह गावातील विविध मान्यवर उपस्थित असणार आहे. 

या उद्धाटन प्रसंगी परिसरातील ग्रामस्थ, उपासक-उपासिका, विविध भजन मंडळे, महिला भारुड मंडळे तसेच युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. 

“वारी प्रबोधनाची” या उपक्रमांतर्गत गावोगावी संतविचारांचे प्रबोधन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा जागर, भजन, कीर्तन, भारुड, प्रवचन तसेच सामाजिक विषयांवरील प्रबोधनपर कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. स्वच्छता, व्यसनमुक्ती, एकोपा, नैतिक मूल्ये, ग्रामविकास व सामाजिक बांधिलकी याबाबत जनजागृती करण्यावर या वारीत विशेष भर देण्यात येणार आहे.

वारीच्या स्वागतासाठी तालुक्यातील अनेक गावे सज्ज झाली असून, ठिकठिकाणी रांगोळ्या, पताका, तोरणे आणि स्वागतफलक लावण्यात येणार आहेत. 

गावकरी मोठ्या उत्साहाने वारीच्या आगमनाची वाट पाहत असून, प्रबोधन कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावत आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तीमय आणि प्रबोधनात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागात सामाजिक जाणीव जागृत होत असून, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा नव्या पिढीपर्यंत प्रभावी प्रसार होत आहे. “वारी प्रबोधनाची” हा उपक्रम केवळ धार्मिक नसून, सामाजिक परिवर्तनाचा एक प्रभावी माध्यम ठरत असल्याचे चित्र वणी तालुक्यात पाहायला मिळत आहे. वारीचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गावागावात गावकरी, श्रीगुरुदेव भजन मंडळ परिश्रम घेत आहे.
Previous Post Next Post