वणी :शहरात सध्या आयपीएलच्या झगमगाटामागे एक भयावह वास्तव उघड होत असून, सट्टेबाजीच्या माध्यमातून तरुणाईला आर्थिक आणि मानसिक खाईत ढकलले जात असल्याचे चित्र समोर येत आहे. हा केवळ सट्ट्याचा खेळ नसून, अत्यंत नियोजनबद्ध ‘फायनान्सियल ट्रॅप’ असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सट्ट्यात मोठ्या प्रमाणावर पैसे गमावलेले युवक हतबल झाल्यावर त्यांना मदतीच्या नावाखाली काही टोळक्यांकडून कर्ज पुरवले जाते. मात्र हे कर्ज साधे नसून, दरमहा १० ते २० टक्के व्याजाने दिले जात असल्याचे समोर येत आहे. कर्ज देताना संबंधितांकडून कोरे चेक, घर-जमिनीची कागदपत्रे तारण म्हणून घेतली जात असल्याने अनेक युवक आर्थिक गुलामीत अडकत आहेत.
या सट्टा-जाळ्यामुळे काही युवकांनी आपली दुकाने, घरे, शेती विकल्याच्या घटना समोर येत आहेत. तर काहींनी मानसिक तणावातून आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याचीही चर्चा शहरात सुरू आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ आर्थिक न राहता सामाजिक संकटाच्या दिशेने जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
या संपूर्ण प्रकारामागे वणीतील काही ‘बडे मासे’ आणि पडद्यामागील खरे सूत्रधार सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तरुणाईला वाचवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.