वणी तालुक्यातील पळसोनी येथे अनधिकृत आणि भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या कापूस बियाण्यांच्या विक्रीचा मोठा प्रकार उघडकीस आला असून कृषी विभागाच्या तक्रारीवरून पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल १ लाख १५ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, यवतमाळ यांच्या फिर्यादीवरून आरोपी अरुण शंकर भट (वय ४५, रा. पळसोनी ता. वणी) याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. ६ मे २०२६ रोजी रात्री ९ ते ९.२० वाजताच्या सुमारास आरोपीच्या राहत्या घरावर छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी प्रतिबंधित व अनधिकृत कापूस बियाण्यांची साठवणूक व विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिस व कृषी विभागाच्या संयुक्त कारवाईत विविध कंपन्यांच्या नावाने विक्रीस ठेवलेली RR, Pinkgard-III, Pinkgard-5 आणि Hybrid Cotton Seeds अशी बियाण्यांची मोठी खेप आढळून आली. कारवाईदरम्यान SURAKSHA, KAVERI, SILVER, GALAXY HYPER, JUMBO 5G PREMIUM, DHOOM-2, HARYALI 702, माऊली-5G आदी नावांची एकूण ८१ पाकिटे जप्त करण्यात आली. यातील अनेक पाकिटांचे नमुने बीज परीक्षण प्रयोगशाळेसाठी सीलबंद करून वेगळे काढण्यात आले आहेत. या प्रकरणी आरोपीविरुद्ध बियाणे अधिनियम १९६६ व १९६८ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ/१२ अविनाश चिकराम, पोलीस स्टेशन वणी हे करीत आहेत.