वणी :तालुक्यातील नेरड येथील विवेकानंद विद्यालयातील सहायक शिक्षक नितीन गावंडे यांची कहाणी ही केवळ पेन्शन हक्काची लढाई नाही, तर ती आहे अन्यायाविरुद्ध उभ्या राहिलेल्या एका साध्या शिक्षकाच्या असामान्य जिद्दीची. नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्ती होऊनही “अप्रशिक्षित” या कारणावरून त्यांना जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न झाला. नियमांच्या गुंतागुंतीत अडकवून त्यांचा हक्क नाकारला जात होता. अनेकांनी हा लढा सोडून देण्याचा सल्ला दिला. “हे शक्य नाही” अशी निराशेची कुजबुज त्यांच्या कानावर पडत होती. पण गावंडे सरांनी हार मानली नाही कारण त्यांच्या पाठीशी उभा होता एक अदृश्य पण अढळ आधार… त्यांच्या वडिलांचा संस्कारांचा हात. त्यामुळे या संघर्षाची कठीण परिस्थितीवर वाट काढत कागदपत्रांची जुळवाजुळव, प्रशासनाकडे सततचा पाठपुरावा, न्यायालयीन खर्च आणि मानसिक ताण या साऱ्यांचा सामना करत त्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले. प्रत्येक सुनावणीच्या आधी मनात एकच प्रश्न..!“आज न्याय मिळेल का..?” अखेर ११ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई उच्च न्यायालय यांच्या नागपूर खंडपीठाने ऐतिहासिक निर्णय देत स्पष्ट केले की, मूळ नियुक्ती तारीख महत्त्वाची आहे; प्रशिक्षणाचा कालावधी पेन्शन पात्रतेस अडथळा ठरू शकत नाही..! हा निर्णय केवळ कायदेशीर विजय नव्हता , तो आत्मसन्मानाचा, सत्याचा आणि जिद्दीचा विजय होता. या लढ्यात शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, विमाशीचे प्रांतीय अध्यक्ष अरविंद देशमुख, आनंदकुमार शेंडे पुरोगामी शिक्षक संघटना तसेच यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी ठाम साथ दिली. न्यायालयात प्रभावी मांडणी करणारे वकील क्षीरसागर यांनी कायदेशीर बाजू भक्कम केली त्यामुळे हा विजय शक्य झाल्याचे यावेळी शिक्षक नितिन गावंडे यांनी सांगितले . आजचा हा निकाल महाराष्ट्रातील नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त पण अप्रशिक्षित असलेल्या हजारो शिक्षकांसाठी आशेचा किरण ठरणार आहे. शिक्षक नितीन गावंडे यांचा हा विजय केवळ एका व्यक्तीचा नसून तो एका वडिलांच्या संस्कारांचा, एका कुटुंबाच्या विश्वासाचा आणि संपूर्ण शिक्षक समाजाच्या आत्मसन्मानाचा विजय आहे. संघर्षातूनच इतिहास घडतो… आणि त्या इतिहासात आज नितीन गावंडे हे नाव जिद्दीच्या सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे.
वडिलांच्या संस्कारांचे अश्रूंतून उमटलेले श्रेय..
या विजयाच्या क्षणी शिक्षक नितिन गावंडे गावंडे यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले ,कारण त्यांना आठवले ते त्यांच्या वडिलांचे शब्द. “प्रामाणिकपणे जग, अन्यायासमोर कधीही झुकू नकोस,” हा संस्कार त्यांनी लहानपणापासून दिला होता. संघर्षाच्या प्रत्येक कठीण टप्प्यावर, जेव्हा मन खचत होते, तेव्हा वडिलांची शिकवणच त्यांना उभारी देत होती. कधी शांतपणे प्रोत्साहन देणारे, कधी कठोर शब्दांत धैर्य देणारे ते वडील आज जरी प्रत्यक्ष सोबत नसले, तरी त्यांच्या आशीर्वादाची छाया या विजयामागे असल्याची भावना शिक्षक नितिन गावंडे यांनी व्यक्त केली. “हा विजय माझा नाही ,तो माझ्या वडिलांच्या पुण्याईचा आहे,” असे भावुक उद्गार त्यांनी काढले.