वणी : अडेगाव परिसरातील ईशान मिनरल्स कंपनीमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, बेकायदेशीर उत्खणनामुळे निसर्गाचा ऱ्हास होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी मंगळवारी दिनांक 10 फेब्रुवारीपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. गुरुवारी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांनी सहकाऱ्यांसह उपोषण मंडपाला भेट देत आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.
ईशान मिनरल्स कंपनी गेल्या काही वर्षांपासून अडेगाव परिसरात कार्यरत आहे. कंपनीतून निघणाऱ्या धुळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात असली तरी नवनाथ महादेव क्षीरसागर यांना गेल्या 11 ते 12 वर्षांपासून कोणतीही भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे दरवर्षी 60 हजार रुपये नुकसान भरपाई तसेच आधीच्या नुकसानीसाठी 3 लाख 30 हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी बफर झोनमधील उत्खणन त्वरित थांबवून उत्खणन केलेल्या परिसराचे पुनर्भरण करण्याची मागणी केली आहे. डी-वॉटरिंगमुळे परिसरात पाण्याची समस्या निर्माण झाल्याने 80 फुटाखालील डी-वॉटरिंग थांबवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. कंपनीतून मोठ्या प्रमाणात धुळ निघत असल्याने रस्त्यावर नियमितपणे वॉटर टँकरद्वारे पाणी मारावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आंदोलनाला संजय खाडे यांच्यासोबत तेजराज बोढे, मोहन पानघाटे, नितेश ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
संजय खाडे यांनी आंदोलनाला पाठिंबा देताना इशारा दिला की, “अडेगावच्या ग्रामस्थांचा लढा हा अन्यायाविरुद्धचा आवाज आहे. ईशान मिनरल्स कंपनीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना प्रशासनाने यात तातडीने हस्तक्षेप करावा. ग्रामस्थांच्या मागण्या मान्य कराव्यात. काँग्रेस पक्ष या आंदोलनाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. शेतकऱ्यांचे नुकसान थांबवले नाही तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून ग्रामस्थांसोबत लढा देईल.