फिस्की जंगलातील अरुंद रस्त्याने वाढवली डोकेदुखी; रुंदीकरणासाठी वाहतूक मंत्र्यांना निवेदन

मारेगाव : मार्डी–वणी (राज्यमार्ग क्र. ३१७) मार्गावरील फिस्की (मच्छिंद्रा) जंगलातील अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका वाढत असल्याने या रस्त्याचे रुंदीकरण करावे तसेच त्या ठिकाणी नवीन उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात नागरिकांच्या वतीने मा. वाहतूक मंत्र्यांना निवेदन देण्यात आले असून ते मा. तहसीलदार, मारेगाव यांच्यामार्फत संबंधित विभागाकडे सादर करण्यात आले आहे.
मार्डी ते वणी दरम्यानचा हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून या रस्त्यावरून दररोज जड व हलकी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. फिस्की जंगलातील काही भागात रस्ता अतिशय अरुंद असल्यामुळे दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी निर्माण होते आणि अपघाताचा धोका वाढतो.
सदर रस्ता जंगल क्षेत्रातून जात असल्याने वनविभागाच्या परवानगीअभावी आजतागायत रुंदीकरण झालेले नाही. विशेषतः पावसाळ्याच्या काळात चिखल, निसरडा रस्ता आणि अरुंद वळणांमुळे परिस्थिती अधिकच धोकादायक बनते. त्यामुळे वनविभागाशी समन्वय साधून या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करावे, तसेच आवश्यक त्या ठिकाणी नवीन उड्डाणपूल बांधण्यात यावा, अशी आग्रही मागणी नागरिकांनी निवेदनातून केली आहे. तसेच ग्रामीण भागातील मंजूर झालेले शिवधुरा, पांदण व वहीवाट रस्त्यांची कामेही पावसाळ्यापूर्वी तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर विजय खिरटकर, अमोल कुमरे, मंगेश देशपांडे, सुनील सोमलकर, प्रमोद मासळकर, गंगाधर ठावरी, मोरेश्वर काकडे, नत्थू धुर्वे, आशिष खिरटकर, नीलकंठ धोंगडे, विलास लिहीतकर, हितेश गायधन आदींच्या सह्या आहेत.
Previous Post Next Post