वणी : तालुक्यातील केसूर्ली ग्रामपंचायतचे सरपंच श्री. मंगेश सुरेश काकडे यांच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करत त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात याकरिता तक्रारदाराने थेट प्रशासनाला लेखी स्वरूपात तक्रार दाखल करण्यात आल्याने केसूर्ली ग्रामपंचायत परिसरात खळबळ उडाली आहे. तक्रारीत सरपंचांनी ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच संबंधित अतिक्रमण जागेचा नमुना ८ अ सरपंचाचे नावे असल्याचे दिसून येते. सदर शासनाची दिशाभूल करीत सरपंचांनी पदाचा गैरवापर केल्याचा प्रकार ग्रामपंचायत मध्ये दिसून येतो आहे. या संदर्भाने सखोल चौकशी केल्यास सरपंचाचे पितळ उघडे पडेल त्यामध्ये कुठली शंका नाही. याशिवाय ग्रामपंचायत निधीचा अनियमित वापर करून आर्थिक अपहार केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच सरपंच पदाचा वापर वैयक्तिक फायद्यासाठी करण्यात आल्याचा आरोपही तक्रारदाराने केला आहे.
या कथित गैरप्रकारांमुळे ग्रामपंचायतीच्या पारदर्शक कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित सरपंचांना पदावरून दूर करून अपात्र घोषित करावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, तक्रारीमुळे या प्रकरणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून संबंधित सरपंचाचे अतिक्रमण संदर्भाने प्रशासन काय कारवाई करेल याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.