वणी (प्रतिनिधी): तालुक्यातील वणी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मोहोर्ली व विरकुंड शिवारात अवैध देशी दारू विक्री जोरात सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. वणी शहरापासून अवघ्या सुमारे 10 किलोमीटर अंतरावर हा प्रकार सुरू असून, स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
गाव परिसरात अवैध दारू विक्रीचा अक्षरशः महापूर आला असून, यामुळे युवक पिढी व्यसनाच्या आहारी जात असल्याची गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक कुटुंबांमध्ये या व्यसनामुळे वाद, भांडणे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दारूच्या नशेत काही जणांकडून सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ, अशांत वर्तन आणि नागरिकांना त्रास देण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, इतक्या गंभीर परिस्थितीनंतरही संबंधित दारू विक्रेत्यांवर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या पार्श्वभूमीवर, अवैध दारू विक्रीवर तात्काळ बंदी घालून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.