मारेगावात पुतळा प्रकरणी ५२ शिवप्रेमी वर गुन्हेपोलीस ठाण्यासमोरच व तहसीलदाराच्या निवासस्थानाजवळ स्थापना तरी दुर्लक्ष कसे

मारेगाव :शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रकरणी शांततेच्या मार्गाने तोडगा निघाल्यानंतर ५२ शिवप्रेमी वर गुन्हे दाखल केल्यामुळे उन्हाच्या पाऱ्यासोबतच पुतळा प्रकरणही तापण्याचे संकेत दिसत आहे. पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांकडून तीव्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलीस ठाण्याच्या अवघ्या शंभर मीटर अंतरावर—अगदी गेटसमोर—पुतळा उभारण्यात आल्याने “प्रशासनाला याची माहिती नव्हती का?” असा सवाल उपस्थित होत आहे. स्थानिकांमध्ये अशी चर्चा आहे की, ही बाब पोलीसांच्या निदर्शनास असूनही दुर्लक्ष करण्यात आले.
घटनेनंतर ५२ शिवप्रेमींवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे. “जर पुतळा बसविणे गुन्हा होता, तर तो उभारताना गस्तीवरील पोलिसांनी तो रोखला का नाही?” असा थेट प्रश्न नागरिक विचारत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात पोलीस प्रशासनाची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी पोलीस प्रशासनाने ५२ शिवप्रेमींवर गुन्हे दाखल केले, हा गंभीर आरोप आहे. सोबतच नारायण बदकी व भाजप चे प्रशांत नांदे यांनी पुतळा उचलण्या विरोधात प्रशासनाला ही गुन्हेगार करण्याची मागणी केली होती, पण संबंधाने तोडगा काढत प्रकरण शांत केले, मात्र दुसऱ्या दिवशी बावन शिवप्रेमींवर गुन्हे दाखल झाले ही बाब अत्यंत निषेधार्ह असून स्वतःच्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी प्रशासन दडपशाहीचा मार्ग अवलंबत आहे, ही लोकशाहीसाठी घातक बाब आहे. आम्ही या कारवाईचा तीव्र निषेध करतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, “सनदशीर मार्गाने न्याय मिळवण्यासाठी आम्ही लढा देऊ. जोपर्यंत दोषी अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या पार्श्वभूमीवर, रात्रीच्या गस्तीवरील संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई का करण्यात येऊ नये, असा प्रश्नही उपस्थित होत असून, निष्पक्ष चौकशीची मागणी अधिक तीव्र होत आहे. शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असले तरी, नागरिकांनी संयम राखत कायदेशीर मार्गाने न्याय मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
Previous Post Next Post