वणी : केंद्रीय गृहमंत्री यांनी आदिवासी समाजाचा उल्लेख "वनवासी" असा केल्याच्या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या शब्दप्रयोगामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत संबंधित वक्तव्याचा सर्वतोपरी निषेध करण्यात आला आहे. आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींनी दिलेल्या निवेदनानुसार, आदिवासी हे या देशाचे मूळ निवासी असून त्यांची स्वतंत्र संस्कृती, परंपरा, इतिहास आणि सामाजिक ओळख आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी वीरांचे योगदान मोठे असून त्यांच्या बलिदानाचा सन्मान राखला गेला पाहिजे, अशी भूमिका समाजाने मांडली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, "वनवासी" हा शब्द आदिवासी समाजाच्या मूळ ओळखीला दुय्यम दर्शविणारा असून समाजाच्या अस्मिता व स्वाभिमानाला धक्का देणारा आहे. संविधानिक आणि प्रशासकीय स्तरावर आदिवासी समाजाला स्वतंत्र मान्यता असताना अशा प्रकारचे संबोधन वापरणे अयोग्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. आदिवासी समाजाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या वक्तव्याबाबत सार्वजनिकरीत्या माफी मागावी तसेच आदिवासी समाजाच्या ओळखीचा सन्मान राखणारे स्पष्ट विधान करावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा देशभरात लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे आदिवासी समाजामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून विविध सामाजिक संघटना आणि आदिवासी नेते याबाबत आपली भूमिका मांडत आहेत. सदर या घटने संदर्भात निषेधार्थ निवेदन देण्यात आले असून यावेळेस उपस्थित ऍड. अरविंद सिडाम , संतोष चांदेकर, डॉ. शैलेश आत्राम, गणेश माघाडे, अशोक नागभिडकर, प्रशांत जुमनाके, अमोल कुमरे, बाबा गेडाम, सुनील नैताम, लहानु सालुरकर, तथा मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.