पोलीस दलात मोठे फेरबदल: भानुदास पिदूरकर वणीचे नवे ठाणेदार; गोपाळ उंबरकर आर्थिक गुन्हे शाखेत!

वणी:परिक्षेत्रीय पोलीस आस्थापना मंडळाने जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात महत्त्वाचे फेरबदल केले आहेत. ठरावीक कार्यकाळ पूर्ण केलेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले असून, यात वणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी (ठाणेदार) गोपाळ उंबरकर यांची बदली करण्यात आली आहे. उंबरकर यांच्याकडे आता जिल्हा पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेची (EOW) धुरा सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, उंबरकर यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या वणी पोलीस ठाण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या पदावर पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिदूरकर हे सध्या जिल्हा नियंत्रण कक्षात आपली सेवा देत होते.
महत्त्वाच्या ठाण्यासाठी रंगली होती चर्चा…
औद्योगिक आणि व्यावसायिकदृष्ट्या प्रगत असलेल्या वणी परिसराला कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानले जाते. यामुळेच यवतमाळ जिल्ह्यातील तसेच राज्यातीलएक महत्त्वाचे पोलीस ठाणे म्हणून वणीची ओळख आहे. या वजनदार ठाण्याचा पदभार मिळवण्यासाठी पोलीस वर्तुळात अनेक अधिकारी उत्सुक होते. जिल्ह्यात नव्याने बदलून आलेल्या अधिकाऱ्यांपैकी कोणाला तरी येथे संधी मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत प्रशासकीय निकष आणि अनुभवाचा विचार करून भानुदास पिदूरकर यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले.

अनुभवी अधिकाऱ्यांकडे नेतृत्व, वणीमध्ये पूर्वी कार्यरत असल्याचा अनुभव…

नवनियुक्त ठाणेदार भानुदास पिदूरकर यांना पोलीस दलातील कामाचा मोठा आणि दीर्घ अनुभव आहे. वणी परिसरातील गुन्हेगारी नियंत्रण, शांतता व सुव्यवस्था राखणे आणि औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा अबाधित ठेवणे, हे त्यांच्यासमोरील मुख्य आव्हान असणार आहे. लवकरच पिदूरकर अधिकृतपणे वणी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारणार आहेत.



Previous Post Next Post