वणी आगार व्यवस्थापकांच्या कथित अन्यायाविरोधात वाहकाचे आमरण उपोषण..


 वणी: आगारातील वाहक मिलिंद देविदास गायकवाड (बी. क्र. ११७) यांनी वणी आगार व्यवस्थापकांकडून पदाचा दुरुपयोग करून आपल्यावर तसेच इतर चालक-वाहक कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप करीत, न्याय मिळावा या मागणीसाठी दि. ९ जानेवारी २०२६ पासून वणी बस स्थानक परिसरात आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.

गायकवाड यांचा आरोप आहे की, वणी आगार व्यवस्थापकांकडून वारंवार किरकोळ कारणांवर निलंबन, अनावश्यक दंड, रजा व सुट्ट्या नाकारणे, तसेच आर्थिक दंडात्मक कारवाया केल्या जात आहेत. यासंदर्भात त्यांनी यवतमाळ विभाग नियंत्रक कार्यालयाकडे वेळोवेळी तक्रारी व पुरावे सादर केले असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

वणी आगारात केवळ आपल्याच नव्हे तर इतर चालक व वाहक कर्मचाऱ्यांवरही अन्याय होत असल्याचे सांगत, अनेक कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात तक्रारी दाखल केल्याचे गायकवाड यांनी नमूद केले आहे. मात्र, प्रकरणांमध्ये दिरंगाई होत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचेही ते म्हणाले.

तसेच, वणी आगार व्यवस्थापकांकडून शासकीय नियमांचे उल्लंघन होत असल्याबाबत, आर्थिक गैरव्यवहार तसेच आगारातील शिस्तभंगाच्या बाबींसंदर्भात विभाग नियंत्रक कार्यालय व संबंधित यंत्रणांकडे तक्रारी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

या सर्व बाबींची चौकशी करून संबंधित आगार व्यवस्थापकांना तात्काळ पदमुक्त (निलंबित) करून बदली करावी व आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलक वाहक मिलिंद गायकवाड यांनी केली आहे. आमरण उपोषण काळात कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित अधिकारी व प्रशासनाची राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

या आंदोलनाची माहिती यवतमाळचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आमदार, पोलीस अधीक्षक, विभाग नियंत्रक, सुरक्षा व दक्षता विभाग तसेच वणी पोलीस ठाण्यास देण्यात आली आहे. तक्रारींसोबत आवश्यक कागदपत्रे व पुरावे जोडण्यात आले असल्याचे आंदोलकांनी सांगितले.


Previous Post Next Post