वणी :कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले युवासेना उपजिल्हा प्रमुख (वणी विधानसभा) अजिंक्य शेंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी आदित्य ठाकरे यांना पाठविल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी अखंड निष्ठा ठेवून त्यांनी अनेक वर्षे युवासेनेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व जनसेवेचे विविध उपक्रम राबविले.
वणी शहरात युवक-विद्यार्थ्यांशी संपर्क साधत प्रवेश मोहीम राबविणे, गरजू नागरिकांना रेशनकार्ड व शासकीय कागदपत्रांसाठी मदत करणे, कोविड काळात ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देणे, शहरात औषध फवारणी करणे, बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त मॅरेथॉनचे आयोजन, उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्री वाटप, २६ जानेवारी रोजी महाराष्ट्रात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूविरोधात धरणे आंदोलन, तसेच छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती व संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त रायगड किल्ला येथे स्वच्छता मोहीम असे अनेक उपक्रम त्यांनी पार पाडल्याचे नमूद केले आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची युवासेना उपजिल्हा प्रमुख म्हणून चार वेळा ‘सामना’ या अधिकृत मुखपत्रातून नियुक्ती करण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे.
मात्र, काही काळापासून स्थानिक पातळीवर कार्यात अडथळे निर्माण होत असून महत्त्वाच्या बैठका, निर्णयप्रक्रिया व नगरपरिषद सीट वाटपामध्ये जाणीवपूर्वक विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वणी शहरातील युवासेना शहर प्रमुख पद दीर्घकाळ रिक्त असून झरी–मारेगाव व मारेगाव तालुक्यातील संघटनात्मक कार्य ठप्प असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
वणी विधानसभा क्षेत्रातील आमदारांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करून काम केले, मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच दुय्यम वागणूक दिली जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. “मीच म्हणजे पक्ष” अशी एकाधिकारशाही भूमिका घेत इतर पदाधिकाऱ्यांना डावलले जात असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
जिल्हा प्रमुख पदासाठी कार्यअहवाल घेऊन मुंबई येथे जाऊन प्रयत्न केले, शिफारसपत्र मिळविण्याचाही प्रयत्न केला; मात्र अपेक्षित पाठबळ न मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
या सर्व परिस्थितीमुळे मन व्यथित झाल्याने स्वाभिमान जपत युवासेना उपजिल्हा प्रमुख (वणी विधानसभा) पदाचा राजीनामा सादर करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पक्ष व नेतृत्वाबद्दल मनात कायम आदर राहील, असेही त्यांनी सांगितले आहे