वणी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्याने ती गरोदर राहिल्याची घटना वणी शहरात समोर आली आहे. या प्रकरणी वणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून २० वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी गरोदर असल्याचे समोर आल्यानंतर तिचे कुटुंबिय तिला गर्भपातासाठी रुग्णालयात घेऊन गेले होते. मात्र, वैद्यकीय तपासणी दरम्यान ती मुलगी अल्पवयीन असल्याची बाब डॉक्टरांच्या लक्षात आली. त्यानुसार हॉस्पिटल प्रशासनाने तात्काळ या प्रकरणाची माहिती वणी पोलिसांना दिली.
माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात पोहोचून मुलीची चौकशी केली. या चौकशी दरम्यान मुलीने आरोपी प्रथम बोटलावार (वय २० वर्ष, रा. वणी) या युवकाशी आपले मागील पाच वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे मान्य केले. तसेच या काळात त्यांच्यात शारीरिक संबंध आल्याचेही समोर आले.
मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी आरोपी प्रथम बोटलावार याच्याविरुद्ध पोक्सो (POCSO) कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला व त्याला अटक केली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.