वणी : तालुक्यात खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांच्या बियाण्यांच्या किंमतीत झालेली वाढ आणि रासायनिक खतांचे चढलेले दर यामुळे उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. त्यामुळे "पेरणी करावी की थांबवावी?" असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
यंदा बियाणे, खत, औषधे, डिझेल, मजुरी आणि सिंचन खर्चात मोठी वाढ झाल्याने शेती करणे अधिक खर्चिक बनले आहे. एका बाजूला उत्पादन खर्च वाढत असताना दुसऱ्या बाजूला शेतमालाला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.
वणी तालुक्यात ग्रामीण भागात सध्या खरीप पेरणीची तयारी सुरू असून कृषी केंद्रांवर बियाणे आणि खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे. मात्र कापूस व सोयाबीन बियाण्यांच्या दरवाढीमुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. चांगल्या दर्जाचे बियाणे घेण्यासाठी अधिक खर्च करावा लागत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
त्यातच काही भागात खतांचा तुटवडा असल्याच्या तक्रारी समोर येत असून उपलब्ध खतासाठीही जादा पैसे मोजावे लागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. वाढत्या खर्चामुळे अनेकांना कर्जाचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र पिकांना योग्य बाजारभाव मिळेल की नाही, याची खात्री नसल्याने शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत.
"खर्च दिवसेंदिवस वाढतोय, पण उत्पादनाला योग्य भाव मिळत नाही. अशा परिस्थितीत शेती करणे कठीण झाले आहे," अशी प्रतिक्रिया तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच वाढलेल्या बियाणे व खतांच्या दरांनी सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करून दर नियंत्रणात आणावेत, खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करावा आणि शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे